यवतमाळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आला. कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. नागरिकांना नियमांचे पालन करावे, असे वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली.
आत्तापर्यंत 60 हजार नागरिकांनी विविध नियमांचा भंग केला आहे. त्यांच्याकडून दीड कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. यातील 515 प्रकरणात न्यायालयाने निकाल देत पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन काळात एकूण 1 हजार 85 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे याप्रकरणी 17 हजार 952 नागरिकांकडून 34 लाख 88 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनाद्वारे नियमांचा भंग केलेल्या नागरिकांची संख्या 44 हजार 780 इतकी आहे. त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे बाजारपेठ, रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी आवाहन करण्यात येते. मात्र, नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे.