यवतमाळ - नेर तालुक्याच्या वाई (इजारा) परिसरातील शेतात सोयाबीनची रास करीत असताना मळणी यंत्रात अडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुनील वसंत जाधव असे यंत्रात अडवून मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर मळणीयंत्रासह मजूर पसार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाई शिवारात मोहम्मद युसुफ अब्दुल सत्तार यांचे शेत असून ते शेत त्यांनी सिंकदर खा यांना कसण्यासाठी दिलं आहे. सिंकदर यांनी त्या शेतात सोयाबीनची लागवड केली आहे. सद्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. त्यांनी सोयाबीनची रास करण्यासाठी सुनील जाधव (वय ३२) यांचे यंत्र बोलावले. रासदरम्यान, यंत्रचालक सुनील हे यंत्रामध्ये सोयाबीनची गंजी ढकलत होते. तेव्हा त्यांचा पाय यंत्रामध्ये गेल्याने आणि ते कमरेपर्यंत मळणी यंत्रात ओढले गेले. यात त्यांचा जागीत मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेर ग्रामीण रूग्णालयात पाठवला. दरम्यान, घटना घडल्यानंतर मळणी यंत्रासह आलेले मजूर घटनास्थळावरुन पसार झाले. त्यामुळे हा घातपात होता की अपघात होता, या चर्चांना ऊत आला आहे.
हेही वाचा - यवतमाळ : कोरोना मृत्यूचे सत्र पुन्हा सुरू; शुक्रवारी चार जणांचा मृत्यू
हेही वाचा - यवतमाळमध्ये कोरोना रुग्ण वाढीच्या संख्येत घट; बरे होण्याचे प्रमाणही वाढले