यवतमाळ - आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी तालुक्यातील गावात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रतेमुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेले आहेत. तर महागाव तालुक्यातील, डोंगरगाव, हिवरा,फुलसावंगी, वरोडी, पोहंडूळ, धनोडा, पेढी, काळी (दौ), बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी आणि चिल्ली अशा ६० गावात भूकंपाचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली.
जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपानंतर नागरिक घराबाहेर पडले. यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आर्णी तालुक्यातील, सावळीपासून १ किलोमीटर अंतरावरील चिचबर्डी-बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तमनगर, वरुड (तुका), उमरी यासह इतर ८ ते १० गावातही भूकंपाचे धक्के जाणवले. उमरखेड तालुक्यातील ढाणकी, बिटरगाव, विडूळ, मन्याळी, वडद, मुडाणा, बेलखेड या गावांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने मध्यरात्री २ आणि ४ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे झटके बसू शकतात, अशी शक्यता वर्तवली आहे. या भागात शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.