यवतमाळ - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. विविध औषध कंपन्या कोरोनावर लस, औषध तयार करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्यापर्यंत कोणतीही लस किंवा औषध तयार झालेले नाही. यवतमाळचे रहिवासी असलेले डॉ. प्रशांत चक्करवार यांनी आयसीएमआरला मोंटूलुकास्ट सोडियम हे औषध कोरोनावर मात करण्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकते, असे सूचवले आहे.
आयसीएमआरने डॉ. प्रशांत चक्करवार यांच्या सूचवलेल्या औषधांची दखल घेतली आहे. मोंटूलुकास्ट सोडियम हे दमा आणि अस्थमा असणाऱ्या रुग्नाच्या उपचारासाठी वापरले जाते. कोरोनामध्ये रुग्नाच्या फुफ्फुसांवर सूज येते आणि रक्तामध्ये गाठी तयार होतात. यावर मोंटूलुकास्ट सोडियम अधिक प्रभावी होऊ शकते. यावर अमेरिका आणि कॅनडा या देशात संशोधनही सुरू आहे.
मोंटूलुकास्ट सोडियम या ड्रगच्या भारतात क्लीनिकल ट्रायलला परवानगी द्यावी यासाठी डॉ. प्रशांत चक्करवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याची आयसीएमआरनेही दखल घेतली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे. आता आयसीएमआरने या ड्रगची क्लिनिकल ट्रायल घेण्याची शिफारस केली आहे. मोंटूलुकास्ट सोडियम हे ड्रग प्रभावी ठरल्यास कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूत घट होणार आहे.