यवतमाळ - कोजागिरी अर्थात माडी पौर्णिमा 30 ऑक्टोबरला साजरी केली जात आहे. त्यासाठी विक्रेत्यांनी मूर्ती विक्रीस आणल्या. परंतु ग्राहक मूर्ती खरेदी करण्यासाठी फिरकत नसल्याने विक्रेते संकटात सापडले आहेत.
दसरा सणांनंतर माडी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरिला दूध पिण्याची पूर्वापार परंपरा आहे. कोरोनामुळे विक्रेते पूर्णपणे संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे. यवतमाळ जिल्ह्यात माडी पोर्णिमेपासून पाच दिवस भुलाबाई म्हणून शंकर-पार्वती यांची मूर्ती बसवण्यात येते. येथील विक्रेत्यांनी 40 ते 50 हजार रुपयांच्या मूर्ती आणल्या असून अजूनही या मुर्ती विक्रीस गेल्या नाही. अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथून या आकर्षक मूर्ती आणल्याचे विक्रेते सांगतात. तर जिल्ह्यातील काही मूर्तिकार घरीच या मूर्ती तयार करतात.
मूर्ती तयार करण्यासाठी, माती, रंग व इतर साहित्य यांचे दर वाढल्याने मूर्तींचे सुद्धा दर वाढलेले आहेत. इतका सारा खर्च करून सुद्धा ग्राहक खरेदीकडे पाठ फिरवत असल्याने मोठ्या आर्थिक संकटाला मूर्तिकारांना समोरे जावे लागत आहे. व्यवसाय ठप्प असल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. येत्या पाच दिवसात किती मूर्तींची विक्री होणार याचा अंदाज विक्रेत्यांना नसल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे.