यवतमाळ - शुक्रवारी केळापूर येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 10 झाली आहे. तर जिल्ह्यात पाच जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेले व उपचाराअंती बऱ्या झालेल्या सहा जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 155 अहवाल प्राप्त झाले. यात सहा पॉझिटिव्ह, 148 निगेटिव्ह आणि एका रिपोर्टचे अचूक निदान झाले नाही. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये केळापूर येथील मृत महिलेचा समावेश आहे. तर उर्वरीत पाच जणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष आहेत. यात यवतमाळ शहरातील एक महिला, एक पुरुष तर नेर येथील दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
गुरुवारी जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 63 होती. यात सहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ही संख्या 69 वर पोहचली. मात्र एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याने हा आकडा 68 वर आला. त्यातच शुक्रवारी सहा जण उपचाराअंती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 62 आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 304 वर पोहचली आहे. यापैकी तब्बल 232 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात दहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयासोलेशन वार्डमध्ये सद्यस्थितीत 84 जण भरती आहे.