यवतमाळ - ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे दोनशेच्या सरासरीने सापडत होते. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा मंदावला असून गुरुवारी(1 ऑक्टो) फक्त 46 रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी पाऊल पडत आहे.
मागील चोवीस तासांमध्ये चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने 46 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. गुरुवारी मृत पावलेल्या चार जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षे आणि 31 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष आणि दारव्हा शहरातील 77 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर पॉझिटिव्ह सापडलेल्या 46 जणांमध्ये 26 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे.
मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील घटली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये 219 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. होम आयसोलेसशनमध्ये 450हून अधिक तर आयसोलेशन वॉर्डात 262 जण आहेत. यवतमाळमध्ये आतापर्यंत 268 कोरोनाबधितांचा मृत्यू झाला आहेत.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, सानिटायझरचा सतत वापर करावा, असे आवाहन केले आहे.