यवतमाळ - कोरोनाचा प्रादुर्भाव हा शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवितांना नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून त्यांचे प्रबोधन करणे तसेच कोविड साखळी तोडण्यासाठी शहरी भागात प्रभागस्तरीय तर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आवाहन केले आहे. या समित्यांच्या माध्यमातून 5 मे ते 25 मे या कालावधीत जिल्ह्यात जाणीव, जागृती व खबरदारी मोहीम राबविण्यात येत आहे.
मनातील भीती दूर करण्याचे काम -
जिल्ह्यात ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय कोरोना नियंत्रण समिती सक्रिय करून समितीमार्फत आजारी, कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या लोकांची माहिती घेणे, त्यांची पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन पातळी तपासणे, लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी करून उपचाराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या मनामध्ये कोविडबाबत, तपासणीबाबत असणारी भीती दूर करणे, कोविड हा आजार लवकर निदान झाले तर बरा होऊ शकतो, हे नागरिकांना पटवून देणे. कोविडसदृश्य लक्षणे असतांना आजार अंगावर काढला आणि चाचणी न करता औषधोपचार घेऊन वेळ वाया घालविला किंवा चाचणीसाठी उशीर केला तर उपचारातील महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन यातून करण्यात येणार आहे.
गैरसमज दूर करणार -
काही नागरिकांच्या मनात कोविड चाचणीबद्दल संभ्रम, गैरसमज आहे. लक्षणे नसलेले लोक पॉझिटिव्ह आल्यावर त्याबद्दल शंका घेण्याची लोकांची भुमिका दिसते. तसेच कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालय येथे घेऊन जाण्याबाबतही नागरिकांमध्ये काही गैरसमज आहेत. तरी हे सर्व गैरसमज/संभ्रम दूर करून रुग्णांचे योग्य समुपदेशन या मोहिमेद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णांच्या मनातील चुकीच्या समजूती, गैरसमज दूर करण्यात येणार आहे.
सामाजिक संस्थाची मदत -
सामाजिक संस्थाची मदत या मोहिमेसाठी घेण्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले असून प्रभागनिहाय सामाजिक संस्थांची नेमणूक करावी. टेस्टींग, ट्रेसिंग- ट्रॅकींग (चाचणी, शोध, पाठपुरावा) या त्रिसूत्रीचा अवलंब, कोविड त्रिसूत्रीचे व ब्रेक दि चेनअंतर्गत नियमावलीचे पालन समितीमार्फत करण्यात येणार आहे.