यवतमाळ - शहरातील आठवडी बाजार भरविण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. आठवडी बाजारासाठी किराणा, मसाला, कापड यासह भाजीव्यावसायिक आपली दुकाने थाटत असताना पोलीस व महसूल प्रशासनाने त्यांना कोव्हिडच्या कारणाने प्रशासनाची संचारबंदी असल्याचे सांगत दुकाने सुरू करण्यास मज्जाव केला. त्यामुळे लघु व्यावसायिकांनी रोष व्यक्त केल्याने आठवडी बाजारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
बदलत असललेल्या आदेशाने व्यापारी संभ्रमात
प्रशासन वेळोवेळी संचारबंदीचे आदेश बदलवीत असल्यामुळे बाजार व्यवसायिक व नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. आठवडी बाजारात दुकाने लावण्यास मनाई असल्याबाबत सूचना प्राप्त झाली नसल्यामुळे जिल्हास्थानी भरणाऱ्या यवतमाळच्या आठवडी बाजारात इतर शहरातील व्यावसायिक नेहमीप्रमाणे आले. या लघु व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली. मात्र, अचानक बाजारास मनाई असल्याचे कारण सांगून कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिल्याने व्यावसायिकांमध्ये रोष निर्माण झाला.
बाजारालाच मनाई का?
शहरातील इतर सर्व बाजारपेठ सुरू असताना आठवडी बाजारालाच मनाई का? बाजारात होणाऱ्या व्यवसायावरच उदरनिर्वाह होतो. मात्र, प्रशासन ठोस उपाययोजना न करता गरीब लघु व्यावसायिकांना वेठीस धरत असल्याने आता जगावे तरी कसे? असे प्रश्न यावेळी व्यावसायिकांनी उपस्थित केले.