यवतमाळ - पत्नीला बेकायदेशीरपणे तीन तलाक देणाऱ्या पती विरोधात अखेर महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायद्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालेल्या गुन्ह्याची ही तिसरी घटना होती. तर, यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. हिवरा येथील आरोपी शेख मोबीन शेख जब्बार याने १५ ऑगस्ट रोजी पत्नी नसरीन परवीनला मारहाण करून तीन तलाकद्वारे घटस्फोट दिला होता.
केंद्र शासनाने तीन तलाक पद्धत घटनाबाह्य ठरवून या विरोधात नव्याने कायदा पारित केला आहे. पीडित नसरीन परविन हिने पतीविरोधात महागाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु, हा गुन्हा महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून ठाणेदार दामोदर राठोड यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. परंतु, अखेर याप्रकरणी महागाव पोलिसांना पीडित महिलेची तक्रार ग्राह्य मानून आरोपी पती विरोधात भादंवि २९४, ५०६, आणि मुस्लीम महिला विवाह हक्काचा संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल करावा लागला आहे.