यवतमाळ : जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी येथे अचानक आलेल्या जोरदार वावटळीमध्ये पाळण्यात झोपलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मंथन राऊत असे त्या चिमुकल्याचे नाव आहे.
लोणी येथे रात्रीच्या सुमारास वादळीवारा सुरू झाला. हे वादळ इतके भयानक होते की लोणी येथील सुनील राऊत यांच्या घरात घुसले. घराच्या लोखंडी अँगलला टीनाचे पत्रे होते. त्या अँगलला पाळणा बांधलेला होता. पाळण्यात सुनील राऊत यांचा दीड वर्षांचा मंथन हा चिमकुला झोपलेला होता.
वादळीवाऱ्याने राक्षसीरूप धारण करून घरावरील टीनाचे छप्पर पाळण्यासहित तब्बल 60 ते 70 फूट उंच हवेत फिरविले आणि खाली कोसळले. यात दीड वर्षांच्या बालकाला गंभीर मार लागला. त्याला तत्काळ यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दीड वर्षाच्या मंथनच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.