यवतमाळ - सोमवारी भाजप उमेदवार डॉ. संदीप धुर्वे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक आहे, की विधानसभा हे राहुल गांधी यांना माहीत नाही, असे म्हणत गांधी यांची खिल्ली उडवली. तर, शरद पवार यांच्या आघाडीच्या सत्ता काळात दलाल मोठे झाले. नेतेही त्यांच्या पक्षात राहायला तयार नाही, असे म्हणत पवार यांच्यावर निशाणा साधला.
या सभेत त्यांनी युती सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचला. प्रचारासाठी मी राज्यात फिरत आहे, लोक सांगतात, या निवडणुकीत कुठेही चुरस दिसत नाही. पाच वर्षांच्या मुलाला विचारले तरी महायुतीच सरकार येणार अस सांगतो. यातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्ता आमचीच येणार याबद्दल विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुक सोडून राहुल गांधी बँकॉकला गेले. ते प्रचारासाठी फिरकले नाही, त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले. गांधी आले की काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला समजा, अशी खिल्ली उडवली. शरद पवार यांच्या सोबत रहायला कुणीही तयार नाही. 'आधे इधर जावो, आधे उधर जावो, बाकी मेरे पिछे आवो', अशी त्यांची अवस्था आहे.
पाच वर्षांत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिलो. यवतमाळ जिल्ह्यात 1,100 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. तर राज्यात 50 हजार कोटींची कर्जमाफी दिली. देशातील सर्वात मोठी कर्ज माफी असल्याचा दावा केला. शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाल्याशिवाय ही प्रक्रिया थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.