यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. हमीभाव मिळण्याकरिता कितीतरी वेळा शेतकऱ्यांनी आंदोलने, मोर्चे काढले. मात्र, शासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. शासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दिवस-रात्र शेतात राबून शेतकरी कष्टाने सोयाबीन, तूर, कपाशी, असे धान्य पिकवितो. पण बाजारात कृषी मालाची आवक वाढू लागली की, तत्काळ मालाचा भाव कमी होतो. त्यामुळे गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी व्यापाऱ्यांच्या घशात जाते. परंतु, जो शेतकरी सधन आहे, अशेच शेतकऱ्यांना बाजारभाव वाढेपर्यंत आपला शेतमाल जपता येतो. मात्र, गरीब अल्पभूधारक शेतकरी हा व्यापारी आणि दलालांच्या विळख्यात सापडला जातो.
शेतकऱ्यांचा माल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येण्याअगोदर तालुक्यातील मोठे व्यापारी व दलालांच्या बैठका सुरू होतात. याचवेळी दर ठरविण्यात आलेले भाव हे निश्चित करून दलालांच्या मार्फत शेतकऱ्यांची फसगत व्हायला सुरुवात होते. कवडीमोल भावाने माल विकून शेतकरी जीवन जगतो व व्यापारी दलाल करोडोपती बनतात. याच कारणाने शेतकऱ्यांचा माल कितीही दर्जेदार असला तरी त्याच्या शेतमालाला कवडीमोल भावच मिळतो. या शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार शासनाने केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शासनाने या समस्येकडे लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा- यवतमाळमध्ये कापसाच्या भावासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन