यवतमाळ- चांगला भाव मिळत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर विक्रीसाठी शेतकर्यांची गर्दी झाली आहे. त्याचवेळी खासगी व्यापार्यांनी तूर खरेदीला सुरुवात केली. त्यामुळे ७०० रुपयांपर्यंत तुरीचे भाव कमी झाले आहेत. तुरीचे भाव व्यापाऱ्यांनीच पाडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.
शासनाने तुरीला ५ हजार ८०० रुपये हमीभाव ठरवून दिला आहे. सोमवार पर्यंत ५ हजार ३०० रुपये भाव तुरीला मिळाला. तूर विक्रीसाठी शेतकर्यांनी ‘नाफेड’ कडे ऑनलाईन नोंदणी केली. मात्र, अद्याप खरेदीला सुरुवात करण्यात आली नाही. शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. तूर घरात अजून किती दिवस ठेवायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. बाजार समितीत समाधानकारक भाव मिळत असल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात तूरविक्रीसाठी शेतकर्यांची गर्दी झाली. या संधीचे सोने करीत व्यापार्यांनी ४ हजार १०० रुपये ते ४ हजार ५०० रुपये भावाने खरेदी सुरू केली. व्यापार्यांकडून होणारी लूट लक्षात आल्याने शेतकर्यांनी आक्रमक पवित्रा घेत खरेदीला विरोध केला. ही लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
हेही वाचा- यवतमाळमधील हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद