यवतमाळ - पुसद तालुक्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याने पुसदपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिलवाडी येथील जूना पूल पावसाने वाहून गेला. पूल वाहून गेल्यामुळे पोखरी व चिलवाडी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
या रस्त्यालगत नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र, तो पूल वाहतुकीसाठी सज्ज नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. या गावांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कुठे मुसळधार तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. अशातच पुसद येथे झालेल्या जोरदार पावसामुळे दोन गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता याठिकाणी पुलाची पाहणी करण्याकरता येऊन तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वस्त ग्रामस्थांना दिले आहे.