यवतमाळ - वणी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपावर कडक शब्दात टीका केली होती. त्यांनी भाजपा-संघावर आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पूनम चौकात खासदार बाळू धानोरकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ३१ ऑक्टोबरला रात्री वादाफळे मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि नेते उपस्थित होते. भाषणात, काँग्रेस हा स्वबळावर निवडून येणारा आणि विकास करणारा पक्ष आहे. संगणक क्रांती काँग्रेसच्या सत्ता काळात झाली. त्यावेळी भाजपाने याला विरोध केला. आता ते विकासकामाचे श्रेय लाटत आहे, असे धानोरकर म्हणाले होते.
खा. धानोरकर यांच्या वक्तव्याचा समाचार
तसेच, केंद्रातील भाजपा सरकार दिशाहीन असल्याचा टोलादेखील धानोरकर यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद यवतमाळ जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार धानोरकर यांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. धानोरकर यांचे ज्ञान, बुद्धी आणि विचार जनतेला समजले आहेत. आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याचा हा परिणाम आहे. अशी टीका भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू पटगीलवार यांनी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत यादव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश धुरड, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.