यवतमाळ - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप आक्रम झाली आहे. भाजपने यवतमाळ पोलीस ठाणे,उमरखेड आणि पुसद पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी दसरा मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोड्याने मारण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली होती.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा भाजपने आरोप केला आहे. पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्यांवर गुन्हा केला नाही, तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा भाजपाकडून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा भाजपचा दावा
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा म्हणाले, की, मुंबई येथे तीन वर्षांपूर्वी दसरा मेळाव्यात समाजामध्ये तेढ असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात दंगली व्हाव्यात या उद्देशाने उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात भडकाऊ भाषण देण्यात आले होते. चिथावणीखोर भाषण करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हा केलेला आहे, अशा आशयाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हिंदू धर्माचे प्रखर समर्थक आणि संपूर्ण जीवन समाजाप्रती व धर्माप्रती समर्पित केलेले महान नेते असल्याचा दावा भुतडा यांनी केला. पुढे ते म्हणाले, की त्यांच्याप्रती आम्हा सर्वांना विश्वास आहे. त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा उचलला आहे.
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राजू पडगीलवार यांच्या नेतृत्वात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. इतरही तालुक्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दिली जाणार आहे. एकंदरीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्यानंतर विरोधात भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देऊन शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केलेली आहे.
हेही वाचा-खासदार-आमदारांच्या प्रकरणात सीबीआयसह ईडीकडून दिरंगाई; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
हेही वाचा-राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे टाळले, म्हणाले 'आता चांगल्या शब्दात टीका करणार'
हेही वाचा-Narayan Rane Case : नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा
- काय आहे प्रकरण?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी राज्यातील विविध पोलीस ठाण्यात नारायण राणेंविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणी राणेंना मंगळवारी अटक आणि सुटका झाली होती. राणेंविरोधात महाड, नाशिक, पुण्यामध्ये तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र, हे सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका नारायण राणेंनी हायकोर्टात केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. १७ सप्टेंबरपर्यंत नारायण राणेंना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.