यवतमाळ - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु.) ग्रामपंचायतीचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गावचे सरपंच प्रकाश पेंधे व लाभार्थी रुखमाबाई दासरवाड यांच्यासह जिल्हा परिषदेच्या पथकाने राज्यपालांच्या हस्ते हा गौरव स्वीकारला.
हेही वाचा - 'पलट के आऊंगी' म्हणत अमृता फडणवीसांचा शायरीमधून सूचक इशारा
नरीमन पॉईंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अपर सचिव असीम गुप्ता, ग्रामीण गृहनिर्माणच्या राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानच्या माध्यमातून बिटरगाव (बु.) येथे घरकुलशिवाय, घरोघरी शौच्छालये, ग्रामस्थांना रोजगार, शोषखड्डे, सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन समिती अंतर्गत गॅस जोडणी, धूरमुक्त गाव, ग्रामकोष निधीतून वॉटर एटीएम, आरओ फिल्टर, शुध्द पाणीपुरवठा, मानव विकास मिशन अंतर्गत गरोदर माता, स्तनदा माता तसेच 0 ते 6 वयोगटातील मुलांची वैद्यकीय तपासणी, अंगणवाडीतील मुलांना गणवेश, डिजीटल शाळा, सोलरयुक्त शाळा, बचतगटाच्या माध्यमातून प्रशिक्षण, नोंदणीकृत कामगारांना बांधकाम साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य पुरवठा, जलसंधारणाची विविध मॉडेल आदी विकासात्मक कामे करण्यात आली आहेत.
हेही वाचा - आर्थिक विवंचनेतून औरंगाबादेत उद्योजकाची आत्महत्या