यवतमाळ - लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून अतिरिक्त शुल्क आकारले आहे. याचा विरोध करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयावर धडक मोर्चा काढत प्राचार्य प्रा. दुर्गेश कुंटे यांना घेराव घातला.
कोरोना काळात महाविद्यालयीन शुल्क कमी करावे यासाठी अभाविपने आंदोलन केले होते. अमरावती विद्यापीठानेही त्यांची मागणी मान्य केली आहे. तरीही अणे महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून सायकल स्टँड, आय कार्ड, हेल्थ, सुरक्षा व सुविधा शुल्क उकळले आहे. या सुविधांचा विद्यार्थिनीनी लाभ घेतला नसतानाही त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड लादल्या गेला आहे.
प्राचार्यांची उडवाउडवीची उत्तरे -
इमारत बांधकाम निधीच्या नावाखाली महाविद्यालयाने प्रत्येकाकडून एक हजार रुपये घेतले आहेत. ते विद्यार्थिनींना परत द्यावे, अशी मागणी अभाविपने केली. यापूर्वी अभाविपच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात निवेदन दिले होते मात्र, तेव्हा प्राचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपने केला आहे. मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अभाविपने आंदोलन थांबवले.