यवतमाळ - जिल्ह्यात वणीतील 'रेडलाईट एरिया' म्हणून विख्यात असलेल्या वस्तीत अनेक वारांगना देहविक्री करून पोटाची खळगी भरतात. समाजात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असला तरी तेही समाजाचा एक घटकच आहेत. आज जवळपास दीड महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीत कुणीही सामाजिक संस्था, प्रशासन त्यांच्याकडे फिरकले नसल्याची आपबिती या महिलांनी बोलताना सांगितली.
गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण भारतात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात अनेक जण आपा-पली कहाणी सांगत आहेत. कुणी विदेशात अडकलेले आहेत, तर कुणी शहरात अडकले आहेत, कुणी आपल्या परिवारापासून दूर आहे. परंतु, या सर्व काळात कुणीही या वणीतील वारांगना वस्तीकडे लक्ष दिलेले दिसत नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यांच्या वस्तीत जवळपास 63 घरे आहेत. ज्यामध्ये जवळपास 250 ते 300 महिला व लहान बालके राहतात. या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनेक जण कोरोनाच्या दहशतीखाली असल्याने कुणीही ग्राहक यांच्याकडे फिरकत नाही. त्यातच कोरोनाच्या भीतीने या वारांगनांनी आपला व्यवसायसुद्धा बंद केला आहे. त्यांची लहान बालके कसे दिवस काढतात किंवा या देहविक्री करणाऱ्या वारांगना आपले दिवस कसे काढत आहेत, याकडे पाहण्याची कुणीही दखल घेताना दिसून येत नाही.
लॉकडाऊनच्या काळात आपण अनेक प्रसार माध्यमांतून अमूक सामाजिक कार्यकर्त्यांकडून इतके अन्न रोज वाटले असल्याचे वृत्त नेहमीच वाचत असतो किंवा कोणत्या राजकारणी व्यक्तीकडून गरिबांना मदत केल्याचे नेहमीच ऐकावयास मिळते. परंतु, या सर्व काळात कुणी वारांगना वस्तीमध्ये जाऊन अन्न किंवा इतर मदत केल्याचे कधीच दिसून येत नाही. लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, उद्योजक या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळात फिरकले नसल्याची आपबिती महिलांनी सांगितली.