यवतमाळ - लॉकडाऊन काळात परदेशात जाणारी आणि देशांतर्गत सर्व विमान आणि रेल्वेसेवा बंद झाली. लॉकडाऊनच्या २१ दिवसाच्या काळातील रेल्वेने प्रशासनाने आरक्षित तिकिटांचे सर्व भाड्याचे पैसे वापस दिले. मात्र, देशांतर्गत चालणाऱ्या खासगी विमान कंपनीने या काळात आरक्षित विमान सेवेचे भाडे परतावा करण्यास नकार दिल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
यवतमाळतील १२ पर्यटक हे ६ एप्रिल ते १२ एप्रिल याकाळात पर्यटनासाठी उत्तराखंड येथे जाणार होते. याच काळात नागपूर ते नवी दिल्ली करीता ६ एप्रिलला त्यांनी 'गो ऐयरवेज'चे तिकीट बुक केले. तसेच परत येण्याकरीता १२ एप्रिलचे 'इंडिगो' या विमान कंपनीचे तिकीट आरक्षित केले. नेमके याच काळात संपूर्ण भारतात पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन घोषित केला. यामुळे देशाबाहेरील आणि देशांतर्गत विमानसेवा बंद पडली. केंद्र शासनाच्या अधीन असलेल्या रेल्वेने याकाळात आरक्षित तिकिटाचा परतावा विनाविलंब परत केला. मात्र, या खासगी विमान कंपन्या तिकिटाचा परतावा देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
कंपन्यांच्या म्हणण्यानुसार या दरम्यान केलेले तिकीट हे समोरील एका वर्षात केव्हाही वापरता (रिशेड्यूल) येईल. याकरीता यवतमाळच्या पर्यटकांनी नकार दर्शिल्यावर या कंपन्यांनी तिकीट भाड्याचा अत्यल्प परतावा वापस देण्याची तयारी दर्शवली आहे. जर रेल्वे भाड्याचा परतावा करू शकते तर खासगी विमानसेवा कंपनी का करू शकत नाही? असा प्रश्न या पर्यटकांनी उपस्थित केला आहे. सरकारने या बाबतीत लक्ष घालावे, अशी मागणी पर्यटकांनी केली.