यवतमाळ - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध घालून देण्यात आले होते. मात्र, आता या आदेशात काही प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. खरीप हंगाम लक्षात घेता कृषी सेवा केंद्र, बि-बियाणे, खते, किटकनाशके, ठिंबक सिंचन, तुषार सिंचन विक्री दुकाने, कृषी साहित्य व कृषी अवजारे इत्यादींची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली. तसेच कृषी निविष्ठा खते, बियाणे, किटकनाशके ह्यांचा माल उतरविण्यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुभा राहणार आहे, असे या आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.
हेही वाचा - पोलिसांनी दलित युवकाला मारहाण करून पाजले मुत्र
कोविड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करा -
बँकींग सेवा देणारे यांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन सेवा देता येईल. मात्र, प्रत्येक ठिकाणी मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर किंवा हँडवॉशने नियमित हात स्वच्छ धुणे या कोविड त्रिसुत्रीचे पालन करणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांना पिककर्ज देण्याबाबतची कार्यवाही प्राधान्याने करण्यासाठी बँका त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. कोविड त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन होत नाही, असे दिसून आल्यास संबंधित सर्व आस्थापनांना पहिल्यावेळी रुपये 5 हजार दंड व त्यानंतर प्रत्येक वेळी रुपये 10 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.