यवतमाळ - शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीत सुद्धा काही शेतकरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या भरवशावर काळ्या मातीतून सोने पिकवत आहेत. दारव्हा तालुक्यातील बिजोरा येथील अशाच एका शेतकऱ्याने फळपिकांच्या माध्यमातून समृध्दीचा मार्ग शोधला आहे. श्रीराम ठाकरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
दारव्हा कुपटा रस्त्यावर अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर बिजोरा येथे श्रीराम ठाकरे यांची 22 एकर शेती आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांमध्ये त्यांना अपेक्षित उत्पादन येत नव्हते. म्हणून त्यांनी भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यातून ठाकरेंना थोडी आर्थिक उभारी मिळाली. यानंतर त्यांनी शेतातील पडकी विहीरही दुरुस्त करून घेतली. शेतात दुसरी विहीर केली. कमी पाण्यावर जास्त क्षेत्र लागवडीखाली यावे, म्हणून त्यांनी ठिबकचा वापर केला. त्यात सीताफळ, मोसंबी, पेरू, आंबा, केळी आदी पिकांची लागवड केली. त्यात केळी वगळता इतर फळपिकांमध्ये पपई, टरबूज, खरबूज असे आंतरपीक घेऊन आर्थिक उन्नती साधली आहे. यावर्षी पपईला विक्रमी भाव मिळाला आहे. त्यांना वर्षभरात सर्व पिकांमधून 25 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.
हेही वाचा - केंद्र सरकारकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांना मदतनिधी मंजूर, महाराष्ट्राला तुटपुंजी मदत
वयाच्या सत्तरीतही ते उत्साहाने शेती करीत आहेत. याप्रकारे ठाकरे यांनी इतर शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.