यवतमाळ- आयसोलेशन कक्षात भरती असलेले आणि सुरुवातीला पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 18 लोकांचा फेर तपासणीत कोरोना अहवाल नेगेटिव्ह आला आहे. डाॅक्टरांनी या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. रविवारी 4 आणि सोमवरी 18 असे दोन दिवसात 22 जण 'पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह' आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
त्यामुळे अॅक्टीव कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 85 वरुन 63 वर आली आहे. गेल्या 4 दिवसात वैद्यकीय महाविद्यालयाने एकूण 296 स्वॅब नमूने तपासणीकरिता पाठवले. यापैकी 224 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यात 221 नेगेटिव्ह तर नेर येथील 3 जण पॉझिटिव्ह आहेत. तर 53 अहवाल प्रलंबित आहेत. काही नमुन्यांचे प्रॉपर निदान झाले नसल्याचे महाविद्यालयाने कळविले आहे.
उमरखेडवरुन 18 लोकांचे कॉन्टेक्ट ट्रैसिंग करण्यात आले असून यापैकी 3 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब नमूने तपासणीसाठी आज पाठवण्यात येणार आहेत. उमरखेड आणि महागाव येथून आणखी 15 लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी आणि आरोग्य पथकाव्दारे आणखी कॉन्टेक्ट ट्रैसिंग करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.