यवतमाळ - जिल्ह्यासाठी घोक्याची घंटा वाजली असून आज एकूण २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे यवतमाळमधील कोरोनाबाधितांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. सर्वजण रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असून ते देखील काही दिवसांपासून आयसोलेशन कक्षामध्ये दाखल होते.
आज सकाळीच एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. तसेच सायंकाळी आणखी ४ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य प्रशासन हादरून गेले आहे. कोरोनाबाधितांमध्ये तीन कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यवतमाळमध्ये जवळपास एक महिन्यापूर्वी ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर देखील ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत १० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २३३ जणांना विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.