वाशिम - तीन दिवसापूर्वी इयत्ता बारावीच्या बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला. वाशिम शहरातील एका धुणी-भांडी करणाऱ्या महिलेच्या मुलीने इयत्ता बारावीच्या वर्गात 90.15 टक्के गुण मिळवले आहेत. साक्षी असे नाव असलेल्या या मुलीन जिद्द आणि कष्टाच्या जोरावर बिकट परिस्थितीवर मात करून दैदिप्यमान यश मिळवले आहे.
वाशिम शहरात राहणाऱ्या उज्वला भड यांची मुलगी साक्षी नारायण भड ही स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होती. पंधरा वर्षांपूर्वी पती नारायणराव भड यांच्या निधनानंतर उज्वला यांनी परिसरातील लोकांची धुणी-भांडीकरून साक्षी व मुलगा ओम यांचा सांभाळ केला. घरची आर्थिक परिस्थिती दयनीय असताना हालअपेष्टा सहन करत उज्वला यांनी मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले. बालपणापासून तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या साक्षीला आईकडूनच शिक्षणाचे खरे बाळकडू मिळाले. साक्षीने सुद्धा स्वतःला अभ्यासात झोकून दिले होते.
महाविद्यालयातील प्राध्यापकांना तिच्या आर्थिक परिस्थितीची जाण असल्यामुळे त्यांनीही तिला वेळोवेळी सहकार्य केले. अगदी तिची फी देखील माफ केली. साक्षीने देखील आई आणि प्राध्यापकांचा विश्वास सार्थ ठरवत यश संपादन केले. तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी सुभाषचंद बंग व डॉ. रोशन बंग या पिता पुत्रांनी स्विकारली आहे. साक्षीची आई त्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी जाते.
साक्षीला व्हायचे आहे सीए -
वडिलांच्या निधनानंतर आईने इतरांची धुणी-भांडी करून मला शिक्षण दिले. याची मला जाणीव आहे. यापुढे उच्च शिक्षण घेऊन सीए होण्याचे स्वप्न आहे. सीए झाल्यानंतर आईची सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत. इयत्ता बारावीसाठी प्रा. कमल अग्रवाल, प्रा. कपिल राठी, प्रा. नितीन पुरोहित, प्रा. गुलाटी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांची मी आयुष्यभर आभारी राहील, अशी प्रतिक्रिया साक्षीने दिली.