वाशिम - जिल्ह्यातील राजुरा परिसरातील लाखो शिवभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या सुदी येथील सिद्धेश्वर मंदिराच्या मुख्य गर्भगृहाची भीत पावसामुळे खचली. मात्र, मंदिर बंद असल्याने अनर्थ टळला.
अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून राजुरामार्गे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुदी येथे परिसरातील लाखो शिवभक्तांचे शक्तिस्थान व श्रद्धास्थान असलेले प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आहे. या मंदिराची निर्मिती शेकडो वर्षापूर्वी करण्यात आली होती. मंदिराची अनेकदा डागडुजीही करण्यात आली होती परंतु, हे मंदीर प्राचिन असल्याने भींंत खचली.
गेल्या चार पाच दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी मंदिराच्या भिंतीत मुरल्याने मंदिराची मागील बाजूची भिंत खचून जमीनदोस्त झाली. त्यामुळे मंदिराचे संपूर्ण काम नव्याने केल्याशिवाय भाविकांना दर्शनाचा लाभ अथवा पूजा अर्चा करणे आता शक्य होणार नसल्याचे दिसत आहे.
निसर्गरम्य वातावरणात असलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिरावर विशेषतः बारस व श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळत असते. संस्थानाच्यावतीने बाराही महिने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच लग्नसोहळ्यासह इतरही सार्वजनिक कार्यक्रम या मंदिरावर मोठ्या प्रमाणात पार पडतात.