वाशिम - देशात बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही बालविवाह थांबताना दिसत नाही. त्यातच एका अहवालानुसार मागील काही काळात विशेषतः लॉकडाऊनच्याच काळात देशात मोठ्या प्रणावर चोरीछुप्या पद्धतीने बालविवाह करण्यात आले आहेत. पंरतु, वाशिम जिल्हा प्रशासनाने मागील दोन दिवसात एकूण दोन बालविवाह होण्यापासून रोखले आहेत.
हेही वाचा... उन्हाळी धान पावसाने शेततातच भिजले, शेतकऱ्यांचे नुकसान
वाशिम जिल्ह्यात प्रशासनाने मागील दोन दिवसात दोन बाल विवाह रोखले आहेत. जिल्हा महिला व बाल विकास विभागातील जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच पाऊले उचलत हे बालविवाह होण्यापासून रोखले आहेत. आज (गुरुवार) रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील एका १६ वर्षीय बालिकेचा विवाह रोखण्यात आले, तर काल (बुधवार) मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील १४ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला आहे. यावेळी या दोन्ही कुटुंबातील संबंधित नागरिकांंचे अधिकारी वर्गाकडून समुपदेशन करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे.
बालविवाह होत असतील तर चाईल्ड लाईन वर संपर्क साधा...
वाशिम जिल्ह्यात यावर्षी एकूण 10 बालविवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले असल्याचे विभागाचे अधिकारी सुभाष राठोड यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले. तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी जवळपास होत असलेल्या विवाहात मुलगा आणि मुलगी यांचे वय काय आहे, याची माहिती घ्यावी. मुलाचे वय हे 21 असावे आणि मुलीचे वय हे 18 असावे, असा कायदा आहे. तेव्हा या वर्षाखालील मुला-मुलींचे विवाह होत असतील तर नागरिकांनी चाईल्ड लाईन '1098' या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुभाष राठोड यांनी केले आहे.
हेही वाचा... 'राज्याचे दोन मंत्री अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात'