वाशिम - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबण्यासाठी बाधित रुग्णाचे निदान आणि उपचार लवकर होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्ह्याच्या सीमेवरील चेक पोस्टवरदेखील कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस . यांनी दिले आहेत. त्यानुसार रिसोड शहरानजीक असलेल्या मेहकर चेकपोस्ट येथे गेल्या १३ दिवसात तीन हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जात आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांसह पालिका प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहनही करीत आहेत. मात्र , नागरिक काहीच देणे-घेणे नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आता प्रशासनाने वर्दळीच्या ठिकाणीदेखील नागरिकांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. याशिवाय चेकपोस्ट येथेही कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत.
दररोज सरासरी २५० नागरिकांची तपासणी
मेहकर चेकपोस्ट येथे कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. या चेकपोस्टवर शिक्षक , आरोग्यसेविका व पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. मेहकर व लोणार या भागातून येणाऱ्या प्रवाशांची या चेकपोस्टवर तपासणी व चाचणी केली जाते. या ठिकाणी लोणार येथील पथक कार्यान्वित आहे, दररोज सरासरी २५० नागरिकांची तपासणी होत आहे. तसेच वाहनांची तपासणी , ई - पासची तपासणीदेखील केली जात आहे. ई-पास नसल्यास संबंधित प्रवाशांना परत पाठविण्यात येते. तसेच जिल्ह्यातील प्रवाशांना ई-पास नसल्यास परजिल्ह्यात जाऊ दिले जात नाही.