वाशिम - जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. रीसोड तालुक्यात अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे सोयाबीन काढणीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. तर जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी 66 पैसे जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की, नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
संतप्त झालेल्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात रिसोड तहसीलवर एल्गार मोर्चा काढला. जिल्ह्यातील सुधारित पैसेवारी ही 50 पैशांच्या आत यावी. तसेच शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सरकारने आमच्या मागण्या वेळीच मान्य करून शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर दसरा आणि दिवाळी सण आम्ही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनासोबत घेऊन मंत्र्याच्या घरी साजरे करू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकार विरोधात वाशिममध्ये भाजपा महिला मोर्चाचा 'आक्रोश'