वाशिम - रिसोड तालुक्यातील नंधाना या गावात शेतातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहायक हे एक नाला ओलांडताना नाल्यातील गाळात अडकले. त्यांना उपस्थित शेतकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. कापणी न झालेले सोयाबीन, सोयाबीनच्या गंजी, भाजीपाला, फळपिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करण्यात येत आहे. या दरम्यान हा प्रकार घडला.
जिल्ह्यात जून, जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला होता. परिणामी अनेक लघु, मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी वाढली. परतीच्या पावसाचा सोयाबीन काढणीला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चित्र आहे.