मानोरा (वाशिम) - तालुक्यातील पोहरादेवी सर्कलमधील अपंग, विधवा महिला, शेतकरी यांच्या मागण्यासंदर्भात अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. यामुळे या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. महंत रमेश महाराज यांनी हे आंदोलन केले.
पोहरादेवी सर्कलमध्ये जंगल आहे. वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करीत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्यावतीने अनेक अधिकारी व पोलिसांचा या टाकीजवळ बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
तसेच या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्त्याने यावेळी सांगितले.