वाशिम - मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद (ईद-उल-फित्र) जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदीमय वातावरणात साजरी करण्यात आली. ईदनिमित्त विविध मशिदीमध्ये मुस्लीम बांधवांनी ईदची नमाज अदा करून एकमेकांना अलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रंगीबेरंगी कपडे परिधान करून मुस्लीम बांधवांनी नमाजासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच ईदगाह मैदानावर येण्यास सुरवात केली. ईदगाह परिसरात सामुहिक नमाज पडण्यात आली. वाशिम, मालेगावमध्ये सकाळी ९ तर कारंजा येथे १० वाजता नमाज अदा करण्यात आली. तत्पूर्वी शहरातील सर्वच मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व मुस्लीम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.