वाशिम- महापुरामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. शिरपूरमध्ये सुद्धा पूरबाधितांसाठी मदत निधी गोळा करण्यासाठी रविवारी व्यापाऱ्यांकडून रॅली काढण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या चार तासात लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला आहे.
व्यापारी संघटनेने पुढाकार घेऊन रविवारपासूनच पाच दिवस मदतनिधी गोळा करण्याचा निर्धार केला होता. या अंतर्गत पहिल्याच दिवशी एक लाखांपेक्षा अधिक रुपयांची मदतनिधी गोळा झाली. विशेष म्हणजे, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतनिधी गोळा करतांना एका फकिराने सुद्धा आपल्यासाठी मागितलेल्या भिक्षेतून जमा झालेले पैसे मदतनिधीच्या बॉक्समध्ये टाकून माणूसकीचा प्रत्यय दिला. यावेळी येत्या पाच दिवसात किमान दोन ते तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पूरग्रस्त भागात पाठविण्याचा व्यापारी संघटनेने मानस व्यक्त केला.