वाशिम - शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या वाणांचे संशोधन केले जाते. आजपर्यंत अनेक गव्हाच्या वाणांचे संशोधन झाले आहे. मात्र, त्यातून साधारण १२ ते १५ क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळणाऱ्या वाणाचा शोध लागला आहे. परंतु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत वाशिम कृषी संशोधन केंद्र येथे संशोधक डॉ. भरत गीते यांनी संशोधित केलेल्या WSM १०९-४ हे वाण सर्वाधिक उत्पन्न देणार वाण ठरणार आहे.
या नवीन गव्हाच्या वाणाची वाशिम जिल्ह्यातील वारंगी येथील परसराम दहात्रे यांनी दीड एकरावर पेरणी केली आहे. त्यातून त्यांना ५० क्विंटल उत्पन्न अपेक्षीत आहे. एकरी १५ हजार खर्च वगळता त्यांना निव्वळ ७५ हजार रुपये नफा मिळणार आहे. WSM १०९ -४ हे नवीन गव्हाचे वाण शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असून, आजपर्यंत जे गव्हाचे वाण विकसित झाले त्या वाणाला थंडी आवश्यक असते. मात्र, या नवीन वाणाला थंडीची गरज नाही.
या वाणावर वातावरणाचा कसलाही परिणाम होत नाही. तसेच एका गव्हाच्या ओंबीमध्ये ७० ते ११० दाणे निघत आहेत. शिवाय याची चपाती चांगली होत असल्याने या गव्हाला बाजारात मोठी मागणी आहे. इतर वाणा इतकाच खर्च असून उत्पन्न मात्र दुप्पट मिळणार असल्याने हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे गहू संशोधक डॉ. भरत गीते यांनी सांगितले.
मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील परसराम दहात्रे यांच्याकडे वडिलोपार्जित ३० एकर शेती आहे. त्यांनी सिंचनाची सोय व्हावी म्हणून ५ की. मी. अंतरावरून ऊर्ध्व मोरणा प्रकल्पातून पाईपलाईन करून सिंचनाची सोय केली आहे. त्यानंतर त्यांनी खरीपात सोयाबीन आणि रब्बीत गहू पीक घेतात. मात्र, पारंपारिक गहू पिकातून त्यांना एकरी १० ते १२ क्विंटल उत्पन्न मिळायचे. मात्र, यंदा त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र वाशिम येथे संशोधन केलेल्या वाशिम वाणाची पेरणी केली आहे. त्यामुळे त्यांना दीड एकरात जास्त उत्पन्न मिळणार आहे.