वाशिम - प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल, तर जगात काहीही अशक्य नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे पाहायला मिळाले आहे. जन्मतःच दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले समाधान तायडे हे अपंगत्वावर मात करत यशस्वीपणे शेती करत आहेत. त्यांनी बीएएमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून वैद्यकीय व्यवसायाला दुय्यम स्थानावर ठेवून ते पूर्णवेळ शेती करतात.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीपासून आजची युवा पिढी दुरावत चालल्याचे चित्र असून ही चिंतेची बाब आहे. देशाला सर्वसंपन्न व बलशाली बनविण्याचे सामर्थ्य आजही शेतीत असल्याने शेती सोबतची नाळ घट्ट ठेवणे नितांत गरजेचे आहे. जन्मतः दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या समाधान तायडे या शेतकऱ्याचे शेतीवरील प्रेम व जिद्द पाहून 'पंगू लंघयते गिरी' या ओळी यथार्थ असल्याची जाणीव होते.
आश्चर्याची बाब म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासही सक्षम नसलेला हा ध्येयवेडा माणूस जिद्दीने शेतातील सर्व अंगमेहनतीची कामे पार पाडत आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसाय धोक्यात येत असल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र, दोन्ही पायांनी जन्मतःच अपंग असलेले समाधान तायडे हे यशस्वीपणे शेती करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता समाधानचा आदर्श घेतल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही, यात शंका नाही.