वाशिम - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पालकमंत्री देसाईंनी आज (मंगळवारी) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, आरोग्य विभागाची सज्जता, खरीप हंगाम आदी विषयांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, उपजिल्हा निबंधक सहकारी संस्था गडेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत चांगले काम केले आहे. मात्र, रेड झोनमधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे. गेल्या काही दिवसात झालेली रुग्णांची वाढ ही चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम करावे. जिल्ह्यात बाजारपेठ तसेच गर्दीच्या इतर ठिकाणी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्या. या क्षेत्रांमध्ये पिण्याचे पाणी, भाजीपाला, औषधे, दुध पुरविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. तसेच या भागातील विद्युत पुरवठा रात्रीच्या वेळी खंडीत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही कोरोना विषयक चाचणी केली जात आहे. जेणेकरून त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होवू नये. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या पथकांच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेतली जात आहे. सध्या खरीप हंगाम असल्याने शेतीची कामांना अडथळा येणार नाही, याची सुद्धा दक्षता घेतली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीना म्हणाले, जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी निधी देण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील वयोवृद्ध व्यक्ती तसेच इतर रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस अधीक्षक परदेशी कायदा व सुव्यवस्थाविषयी माहिती दिली.
पीक कर्ज वितरणाला गती देण्याची गरज -
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ३०७ कोटी रुपये पीक कर्ज वितरण झाले आहे. पीक कर्ज वितरणाचा वेग आणखी वाढविण्याची गरज आहे. बँकेने प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या अनुषंगाने बँकनिहाय आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले. बियाणे व खतांची उपलब्धता, बांधावर बियाणे आणि खते उपक्रमाचा पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने कृषि विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेली ‘कृषि ज्ञानपीठिका २०२०’ ही पुस्तिका अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून पालकमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, पीक कर्ज वितरणाची गती वाढविण्यासाठी प्रत्येक आठवड्यात बँकांची बैठक घेतली जात आहे. लवकरच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संबंधित तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक घेवून पीक कर्ज वितरणाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.