वाशिम - जिल्ह्यातील धार पिंप्री येथील घराची भिंत अंगावर पडून २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई व भाऊ जखमी झाले आहेत. वृषाली योगेश डाखोरे (वय २) असे मृत मुलीचे नाव आहे.
मालेगाव तालुक्यातील धार पिंप्री येथील योगेश डाखोरे, त्यांची पत्नी दिपाली या आपला मुलगा कृष्णा (वय ४ वर्ष) व मुलगी वृषाली (वय २ वर्ष) यांना सोबत घेऊन माहेरी राजुरा येथे जाण्याकरिता निघाली होत्या. यावेळी घराचा दरवाजा लावण्याकरीता दरवाजा ओढला असता अचानकपणे दरवाज्यासमोरची भिंत अंगावर येऊन कोसळली. यामध्ये तिन्ही मायलेक जखमी झाले. यात २ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याने तिला तत्काळ मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर मुलगा कृष्णा व त्याची आई दिपाली हे जखमी झाले. या घटनेमुळे धारपिप्री गावावर शोककळा पसरली असून दोन वर्षे चिमुकलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.