वाशिम - दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गावातील महिलांना एका किलोमीटर अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे. गावात पाण्याचे स्रोत नसल्याने महिलांना खड्ड्यातील पाणी कटोरा घेऊन घोट-घोट जमा करावे लागत आहे. रात्रंदिवस पाण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने अनेक कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ आली आहे.
मालेगाव तालुक्यातील खैरखेडा हे १५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात बहुतांश आदिवासी आणि बंजारा समाजाचे कुटुंब वास्तव्यास आहे. या गावात जानेवारी महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडे टँकरची मागणी केली असून प्रशासन निवडणुकीत मग्न असल्याने अजूनही गावात टँकर सुरू झाले नाहीत. परिणामी नागरिकांवर रात्रंदिवस भटकंती करण्याची वेळ आली आहे.
खैरखेडा हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येत असून येथील विद्यमान खासदार संजय धोत्रे गेल्या दहा वर्षांत एकदाही गावाकडे फिरकले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. फक्त निवडणुकीच्या काळात या गावात मत मागण्यासाठी प्रचाराची गाडी येते. मात्र, आमच्या समस्या कुणीच जाणून घेत नसल्याचे येथील महिला सांगतात.
मागील तीन वर्षांपासून कमी पर्जन्यमानामुळे पाणी पातळी कमालीची घटत आहे. त्यामुळे गावातील विहिरी-बोअरवेल्स आटले आहेत. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असून नाल्यावर थोडा खड्डा करून त्यामधील घोट-घोट पाणी जमा करून आणत आहेत. दूषित पाणी आरोग्यासाठी घातक असल्याचे महिला सांगतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाणी समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सद्यस्थितीत लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करून आपली पोळी भाजण्याचे काम करीत आहेत. तर अधिकारी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामात मग्न आहेत. त्यामुळे दाद मागायची कुणीकडे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. ज्या मतदाराच्या भरवश्यावर निवडणूक जिंकायची त्यांचाच विसर सर्वच पक्षांना पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता अशा पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ असून त्रस्त झालेले नागरिक त्यांना मतपेटीतूनच उत्तर देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.