वाशिम - संचारबंदीमुळे चिकन विक्रेते आणि पोल्ट्री व्यावसायिकाला मोठा फटका बसला आहे. त्यातही चिकनमुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरली आणि पोल्ट्री व्यावसायिक कोलमडून पडले. आता मात्र पुन्हा चिकनचे दर कडाडले आहेत. १० ते २० रुपये किलोने मिळणारे चिकन आता २४० रुपये किलोवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.
कोरोना विषाणू पसरायला सुरुवात झाल्यानंतर देशभर दहशत पसरली. त्यातच चिकनमुळे कोरोना होतो, अशी अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे अनेकांनी चिकन खाणेही बंद केले होते. या आधी संचारबंदीत वाशिम जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात अफवेमुळे चिकनचे दर १० ते ३० रूपये प्रतिकिलो होता. आता मात्र तब्बल २०० ते २४० रुपये किलो दराने चिकनविक्री होत आहे.
जिल्ह्यातील लोकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन दुकाने चालू झाली आहेत. त्यातही दर १६० सोडून २०० च्या पार झाल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.