वाशिम - 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन येत्या 11 ते 12 जानेवारीला अलिबाग जिल्ह्यातील रेवदंडा येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी वर्धा येथील बहार नेचर फाऊंडेशनचे पदाधिकारी 'पर्यावरणपूरक सायकल' हे पक्षी मित्रांचे वाहन व्हावे, हा संदेश घेऊन वर्धा येथून रेवदंडाकडे सायकलने प्रवास करीत आहेत. त्यांचे आज मालेगाव नगरीत वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
हेही वाचा- त्यांच्या 'काश्मीर मुक्ती'च्या घोषणा कशासाठी? फडणवीसांचा ठाकरेंना सवाल
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आणि अमेझिंग नेचर क्लब यांच्यावतीने महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन अलिबाग जिल्ह्यातील रेवदंडा येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध पक्षीतज्ञ आणि लेखक राजू कसंबे राहणार आहेत. यासाठी देशभरातून पक्षीमित्र व पक्षी अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक सायकल हे पक्षी मित्रांचे वाहन व्हावे, हा संदेश घेऊन बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखेडे, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे सदस्य दीपक गुढेकर आणि दर्शन दुधाने हे काल वर्धा येथून रेवदंडाकडे सायकलने सुमारे 800 किलोमीटरचा प्रवास करून 10 जानेवारीला अलिबाग येथे पोहोचणार आहेत. मुंबई ते रेवदंडा आणि अलिबाग ते रेवदंडा असे दोन छोटे टप्पे करून 11 जानेवारीला संमेलनस्थळी ते पोहोचणार आहेत.
संमेलनानंतर हे सायकल स्वार रेवदंडा येथून सायकलने प्रवास करीत मुंबई मंत्रालय येथे जाणार आहेत. त्याठिकाणी वनमंत्र्यांना भेटून 5 ते 12 जानेवारी हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून शासन स्तरावर घोषित करावा याकरिता निवेदन देणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी जूनमध्ये वर्धा-गोंदिया-वर्धा अशी 600 किलोमीटर सायकल यात्रा बहारच्या चारही सायकल स्वारांनी केली. गत वर्षी कराड येथील 32 वे पक्षिमित्र संमेलन सुद्धा वर्धा ते कराड सायकलनेच प्रवास करून पूर्ण केला होता.