वाशिम - वाशिम जिल्ह्यात तोडलेला वीजपुरवठा त्वरित जोडण्यात यावा, यासह विविध मागण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला - नांदेड माहामार्गावरील जिजाऊ चौकात रास्तारोको करण्यात आला. शेतकऱ्यांची वीजबिल माफ केले नाही तर यापुढे उग्र आंदोलन करणार असल्याचे यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले. तासभर चाललेल्या रास्तारोको आंदोलनामुळे बराचवेळ वाहतूक ठप्प झाली होती.
कृषी पंपाची वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जात आहे, तर कोठे डीपीच बंद केला आहे. वाशिम जिल्ह्यात मात्र या कारवाईमुळे संतप्त झालेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
मालेगाव आणि रिसोड मध्येही रास्ता रोको -
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला हा रस्ता रोको आंदोलन मालेगाव आणि रिसोड शहरांमध्येही करण्यात आले. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
काय आहेत मागण्या -
- वाशिम जिल्ह्यातील तोडलेला वीजपुरवठा त्वरित जोडण्यात यावा.
- सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी.
- कृषी पंपाचे वीजबिल थकबाकी 100 टक्के माफ करावीत.