वर्धा - देवाने सुंदर आयुष्य दिले आहे. पण, आयुष्यात एखाद्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली की जीवन जगणे हे कठीण होऊन बसते. मात्र, यालाच कृत्रिम अंगाच्या माध्यमातून आयुष्य व्यवस्थित जगण्यात येते. कृत्रिम अवयवांमुळे का होईना जगण्यात बळ येते. असा २०० दिव्यांगांना कृत्रिम अवयवांद्वारे बळ देण्याचे काम सराफा बाजार दुर्गा पूजा उत्सव समितीने केला आहे.
वर्ध्यातील सराफा बाजार समिती मागील ५० वर्षांपासून दुर्गा उत्सव साजरा केला जातो. यंदा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे केले जात आहे. यात श्रीराम काठाने फाउंडेशन, महावीर सेवा सदन कोलकत्ता आणि अनेकांत स्वाध्याय मंदिरात दिव्यांग बांधवांना कृत्रिम अंग प्रत्यारोपण करण्यात आले. या माध्यमातून अनेक वर्षांपासून दुसऱ्यांचा आधार घेऊन जगणाऱ्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांद्वारे जगण्याचे नवे बळ मिळाले आहे.
या उपक्रमात केवळ वर्धा जिल्ह्यातील नव्हे तर नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील काही बांधवांनी याचा लाभ घेतला आहे. यात सुरवातीला प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या गरजेनुसार त्याचा मोजमाप करत, त्यांचा प्रकृती प्रमाणे कृत्रिम अंग तयार करण्यात आले. त्यांनतर अंग तयार झाले की त्यांना लावून देण्यात आले.
विशेष म्हणजे महावीर सेवा सदन कोलकता यांच्या वतीने इथेच मापानुसार अंग तयार करून देण्यात आले. हे अंग तयार करून देणारे सुद्धा कारागीर हे दिव्यांग होते. यामुळे आपुलकीने तयार केले आहे.
कोणाला हात मिळाले तर कोणाला पाय
कोणी आपले हात तर कोणी आपले पाय अपघात, अपंगत्वातून गमावलेले असतात. या दिव्यांग बांधनाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत पुढील आयुष्य आनंदी करून देण्याचे लाख मोलाचे काम केले. यात कोणाला हात मिळाला कोणाला पाय, गरजेनुसार मिळालेला अंग मिळताच एक नवीन ऊर्जा मिळाल्याचा आनंद दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून आला.