वाशिम - एकीकडे शासन आणि प्रशासन जनआरोग्याच्या दृष्टीने प्रदूषणमुक्तीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. असे असली तरी प्रदूषणाचे संकट कायम असल्याचे चित्र वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पाहायला मिळाले. येथील जैविक कचऱ्यापासून होणारे प्रदूषण ही येथील नागरिक आणि रुग्णांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तर या ठिकाणी निर्माण होत असलेल्या धुरामुळे रुग्णालयातील बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रुग्णालयातील बालरुग्ण अतिदक्षता विभागाला लागूनच रात्रीच्यावेळी जैविक कचरा जाळण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील लहान बाळांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरीही प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचे हे चाललय तरी काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
रुग्णालयातील प्रदुषणावरून रुग्णालयातील जबाबदार अधिकारी व शासनाच्या आरोग्य विभागावर सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला जबाबदार कोण? हे प्रदूषण कधी थांबणार की नाही? आता तरी प्रशासनाने या गंभीर बाबी कडे लक्ष देऊन प्रदूषणाचे संकट दूर करावे, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.