वाशिम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील संतोषी माता मंदिर परिसरात अनेक मजूर पालं बांधून राहत आहेत. संचारबंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, येथे राहणाऱ्या 60 कुटुंबीयांच्या मदतीला सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड हे धावून आल्याने या नागरिकांची भूक भागली आहे.
मालेगाव शहरात लोखंडी डब्बे, चाळण्या बनवून गावभर विकणारी जवळपास 60 कुटुंब आहेत. संचारबंदीमुळे त्यांचा हा व्यवसाय बंद झाला आहे. हातावर पोट असल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती.
ही बाब सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या कुटुंबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय व्हावी, म्हणून संपूर्ण किराणा किटचे वाटप केले. तसेच या सर्वांच्या स्वच्छतेसाठी मास्क, सॅनिटायझर आणि इतर स्वच्छता साहित्य वाटून कोरोनाविषयी जनजागृतीही केली. डॉ. पवन बन्सोड या उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने सामाजिक बांधिलकी जपत उपाशी पोटी राहत असलेल्या मजुरांच्या उदरनिर्वाहाची सोय लावून दिल्याने या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.