वाशिम - समाजातील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केले जातात. मात्र, तरीही भटकंती करणाऱ्या समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच असल्याचे पहायला मिळते. या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील एक आधुनिक सावित्री धडपड करत आहे. संगीता ढोले असे त्यांचे नाव असून त्या वाशिम पोलीस दलात कार्यरत आहेत. संगीता यांनी सामाजिक जाणिवेतून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे. कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम त्या करत आहेत.
सुरू केली पालावरची शाळा -
वाशिम शहरालगत पोटासाठी भटकंती करणाऱ्या समाजातील लोकांनी पाल टाकले आहेत. लॉकडाऊन दरम्यान संगीता यांची जवळच असलेल्या चेकपोस्टवर ड्युटी लागलेली होती. ड्युटीवर येता-जाता त्या पालावरील मुलांना बघत असत. त्यांच्या मनात या मुलांच्या शिक्षणाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला आणि त्यातून पालावरची शाळा उभी राहिली. संगीता यांनी या मुलांना एकत्र करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण केली. गेल्या वर्षभरापासून त्या हे कार्य करत आहेत.
मुलांचे भविष्य सुधरेल -
संगीता यांच्या प्रयत्नामुळे पालावर गेल्या सहा महिन्यांपासून बाराखडीचा आवाज घुमत आहे. शिक्षण मिळाल्याने मुलांना अक्षराची, एबीसीडीची ओळख झाली. आता ही मुले शिकून मोठ्या नोकरीवर जाण्याची स्वप्न बघत आहेत. तर पालकांनाही आपल्या पाठीशी कुणीतरी असल्याचा आनंद आहे. मुलांना शिक्षण मिळाल्याने समाज सुधरेल, अशी आशा पालकांना आहे.