वाशिम : जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल १३ व्यक्तींचे चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाले आहे. या १३ ही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल १३ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने ९ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल १० मे रोजी प्राप्त झाले असून सर्व १३ व्यक्तींचे अहवाल 'निगेटिव्ह' आले आहेत. हे सर्वजण नेर (जि. यवतमाळ) येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील कवठळ (ता. मंगरुळपीर) येथील एक व्यक्ती वर्धा येथील रुग्णालयात उपचार घेत असून त्याला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची माहिती संकलित करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.