वर्धा - यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याच्या भितीने अनेक तालुक्यात नियोजन करण्यात आले, तर काही भागात तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकारही घडला. वर्धा शहरात ४ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, तर ग्रामीण भागात नळ शोभेचे वस्तू झाल्याने टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
शहराला तसेच लगतच्या ११ ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्याचे काम तब्बल ३५ किमी अंतरावर असलेल्या धाम प्रकल्पातून केले जाते. धामप्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी हे येळाकेळी येथे आणले जाते. त्यानंतर येळाकेळी आणि पवनार याठिकाणी पाण्याची साठवणूक केली जाते. त्यांनतर पंपिंग करून वर्ध्यातील हनुमाम टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथून ११ ग्रामपंचायती तसेच जीवन प्राधिकरण आणि नगर पालिकेच्यावतीने शहराला पाणी पुरवठा केला जातो.
यंदा सरासरीपेक्षा कमी झालेले पर्यजन्यमान, पाण्याचे बाष्पीभवन पाहता केवळ धाम प्रकल्पात केवळ ३ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक राहिला आहे. मात्र, या शिल्लक साठ्याचे नियोजन पाहता २० जूनपर्यंत पाणी पुरणार आहे. यासाठी शहराला दर ४ दिवसांनी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मान्सून लांबल्यास मात्र मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास मृत साठ्याचा उपयोग करण्याचीही वेळ येऊ शकते. त्या अनुषंगाने बैठक घेऊन नियोजन केले जाणार आहे.
पाणी टंचाई पाहता सप्टेंबर, ऑक्टोबरपासून नियोजनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे २ दिवसाआड मिळणारे पाणी ६ दिवसाआड देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना पूर्वीपासून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. या उलट आता उन्हाळा पाहता पाण्याची अधिक गरज असल्याने ४ दिवसानी पाणीपुरवठा होत आहे. तसेच येळाकेळी आणि पवनार येथे पाणी साठवले जात होते. त्यामुळे अगोदरच या भागातील गाळ काढण्याचे काम करून पाणी साठवण क्षमता वाढवल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी ईटीव्ही सोबत बोलतांना सांगितले.
शहराला लागून ११ ग्रामपंचायती आहे. त्यांनासुद्धा याच माध्यमातून पाणी दिले जाते. पण असे असले तरी या भागात पाणी पोहोचत नसल्याची ओरड होत आहे. शासकीय निकष पाहता पाणी टंचाई नाही. मात्र, प्रत्यक्षात पाणी पुरवण्यासाठी टँकरने व्यवस्था करावी लागत आहे. यासाठी बाजज ग्रुप आमदार मित्रा परिवार आणि एक सरपंच अजय गौळकार मित्रपरिवार, असे तीन टँकर लावून पाणी पुरवठा करत असल्याचे पिपरी ग्रामपंचायतचे सरपंच अजय गौळकार यांनी सांगितले.
घरात नळ असून सुद्धा पाणी येत नसल्याने पाण्यासाठी घराबाहेर भांडे ठेवून टँकरची वाट पहावी लागत आहे. याबद्दल जीवन प्राधिकरणाकडे विचारणा केल्यास पाईपलाईन फुटल्याचे कारण पुढे केले जाते, असा आरोप स्थानिक प्रज्ञा झुंकुरकर आणि राजेंद्र हातहजरे यांनी केला.