वर्धा- शहरात धाम नदीच्या येळाकेळी पंपहाऊसमधून पाईपलाईनद्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावर आणले जाते. येळाकेळी शिवारात पाण्याची पाईपलाईन फुटली. आठवड्यात पवनार येथून येणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे पिपरीसह अकरा गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पिपरीसह अकरा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याकरीता येळाकेळी येथील पंपहाऊसच्या साह्याने पाणी पाईपलाईन द्वारे शहरात आणले जाते. या योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. याबाबत जीवन प्राधिकरणाला माहिती मिळाल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. तोपर्यंत हजारो लीटर पाणी वाहून गेले. याबाबत जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, या फुटलेल्या पाईपलाईनचे काम लवकरात लवकर दुरुस्त करून २४ तासात काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
या पाईपलाईनवर सुमारे ३१ हजार कनेक्शन आहे. यात ग्रामीण आणि शहरातील नळधारकांचे कनेक्शन आहे. त्यामुळे फुटलेल्या पाईपलाईनचा परिणाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगोदरच पिण्यायोग्य पाणी कमी असल्याने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यात आणखी भर पडू नये, अशी आशा नागरिकांकडून जात आहे. सोबतचा या प्रकारांमुळे संतापसुद्धा व्यक्त केला जात आहे.
वारंवार पाईपलाईन फुटण्याचे नेमके कारण काय ?
सध्या शहरात पाणीटंचाई आहे. त्यातही मुख्य जलस्रोतात पिण्यायोग्य पाणीसाठा जेमतेम आहे. यात अशा पद्धतीने पाईपलाईन फुटणे या टंचाईत आणखी भर घालणारी आहे. या आठवड्यातील पाईपलाईन फुटण्याची दुसरी घटना आहे. या दोन्ही वेळी फुटलेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे या पाईपलाईन फुटण्याच्या कारणांचा शोध घेतल्यास पाण्याची नासाडी होणार नाही.