वर्धा - कोरोनाचा एकही रुग्ण नसल्यामुळे वर्धा ग्रीन झोनमध्ये आहे. ग्रीन झोनला ग्रीनच ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी नवनवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात जबाबदारी कमी झाली असे न समजता सोशल डिस्टनसिंग काटेकोरपणे पाळले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी 'यलो वॉच' नावाचे एक पथक तयार केले आहे. हे पथक नागरिकांवर करडी नजर ठेवणार आहे.
ग्रीन झोनमध्ये असल्याच्या सवलती मिळताच जिल्ह्यातील दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांची गर्दी होऊन नियमांचे पालन होणार नाही, ही शक्यता लक्षात घेऊन हे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामध्ये 25 जणांचा समावेश आहे. यामध्ये सात नगर परिषदेचे तर 18 महसूल विभागाचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हे यलो वॉच पथक वर्धा शहर आणि लगतच्या 11 ग्रामपंचायतीच्या परिसरात लक्ष ठेवणार आहे. पथकातील सदस्यांना पिवळ्या रंगाचे टी शर्ट देण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून या पथकाच्यावतीने बाजारात पाहणी करण्यात येत आहे.